खासदार सुप्रिया सुळे यांची विशेष उपस्थिती
पुणे, दि. १४ (प्रतिनिधी) - नव्या पिढीला वारकरी संगीताचा परिचय करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने उद्या (दि.१५) 'संतविचारांचा सुरेल आविष्कार ' हा रिंगण भजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वारजे येथील अतुल नगर भागात अविस्मरा सेलिब्रेशन्स, चितळे बंधू मिठाईवाले शेजारी येथे उद्या दुपारी साडेचार वाजता हा सोहळा रंगणार असल्याची माहिती चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
खासदार सुळे यांच्याच संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. वारकरी संगीत ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची परंपरा असून त्याला भक्ती सोबतच अध्यात्माची एक मोठी परंपरा आहे. समजोन्नतीसाठी आपल्या संतांनी त्यांच्या भजन, अभंग आणि गवळणी तसेच भारुड, कीर्तन आदी संगीत परंपरांची एक खूप मोठी देणगी महाराष्ट्राला दिली आहे. ही परंपरा, विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवेत यासाठी या भजन सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
परभणी येथील गंगाखेडच्या ज्येष्ठ कीर्तनकार हभप गोदावरीताई मुंडे या सोहळ्याचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. त्यानंतर चव्हाण सेंटरतर्फे विविध ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या. वारजे येथे उद्या होत असलेल्या या पहिल्या 'रिंगण भजन सोहळ्यास' मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.