By Editor on Monday, 24 July 2023
Category: Press Note

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर गोखळी, तरंगवाडी येथे उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करावा

खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे मागणी

पुणे : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर इंदापूर तालुक्यातील मौजे गोखळी आणि तरंगवाडी या गावातील स्थानिक नागरिकांसाठी उड्डाण पुल अथवा भुयारी मार्ग करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. गोखळी या गावची लोकसंख्या २००० ते २२०० असून येथील अनेक नागरिक व्यवसायानिमित्त, मजुरी निमित्त बाहेरगावी ये जा करत असतात. तसेच गोखळी गावात गुरुकुल विद्यामंदिर असून आसपासच्या गावातून अनेक मुले या शाळेत येतात.गोखळी, तरंगवाडी व झगडेवाडी परिसरातील ग्रामस्थ, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी व विद्यार्थी यांना आपल्या दैनंदिन कामानिमित्त नेहमी पालखी महामार्ग ओलांडून जावे लागते.

वास्तविक महामार्गावरील नित्य वर्दळीची वाहतूक पाहता गोखळी गावात महामार्ग ओलांडताना एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठिकाणी स्थानिक नागरिकांसाठी उड्डाण पुल अथवा भुयारी मार्गाची आत्यंतिक आवश्यकता आहे या करिता ग्रामस्थांकडून सातत्याने मागणीही केली जात आहे. याचा सकारात्मक विचार करून गोखळी व तरंगवाडी गावासाठी उड्डाण पूल अथवा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी खासदार सुळे यांनी आपल्या पत्रातून केली आहे. 

Leave Comments