By Editor on Monday, 17 April 2023
Category: Press Note

खासदार सुळे यांची भारत बांबू कंपनीला भेट

पुणे : आंबेगाव येथील चंद्रभागा नगर चे निलेश मिसाळ यांच्या 'भारत बांबू' या कंपनीला भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी तेथील उत्पादनांची माहिती घेतली. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी मिसाळ यांनी बांबूपासून बायोकम्पोस्ट उत्पादने बनवली आहेत. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करून सुळे यांनी त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

खासदार सुप्रिया सुळे या काल बारामती लोकसभा मतदार संघातील हवेली तालुक्यात आंबेगाव दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात असताना त्यांनी मिसाळ यांच्या कंपनीला भेट दिली. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी मिसाळ यांनी पर्यावरणपुरक बायोकंपोस्ट उत्पादने बनवली आहेत. बांबूपासुन त्यांनी उत्तमोत्तम कलाकृती साकारल्या आहेत. त्यांत रोजच्या वापरातील वस्तु, सायकल्स, बाग किंवा इतर वास्तूंसाठी आकर्षक कुंपण, घरगुती फर्निचर, कुंड्या, आदी हस्तकला उत्पादने त्यांनी केवळ नैसर्गिक टिकाऊ असा बांबू वापरून बनवली आहेत. यासाठी सुळे यांनी त्यांचे कौतुक केले.

'भारत बांबू' कंपनीने बांबूपासुन बनवलेल्या कलाकृती G-20 परिषदेत परदेशी प्रतिनिधींनाही भेट देण्यात आल्याचे यावेळी मिसाळ यांनी खासदार सुळे यांना सांगितले. ते लवकरच आपली कंपनी भोर तालुक्यात स्थापन करणार असून त्याचा महिला बचत गटांना फायदा होऊन रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. त्यासाठी त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी सुळे यांनी दिले. 

Leave Comments