By Editor on Friday, 03 March 2023
Category: Press Note

सातव्या वेतन आयोगासाठी आंदोलन करणाऱ्या कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांना खा. सुळेंचा पाठिंबा

पुणे : सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठींबा दर्शविला आहे. मंगळवार (दि. २८ फेब्रुवारी) पासून कृषी खात्याच्या सर्व संवर्गातील कर्मचारी आंदोलन करत आहेत, त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

हे कर्मचारी सध्या शांततामय मार्गाने आंदोलन करत असून येत्या २३ मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल दिला मात्र त्यात या समितीने कृषी खात्यातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना डावलले असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. यामुळे हे सर्व कर्मचारी प्रचंड नाराज आहेत, असे सुळे यांनी म्हटले आहे.

कृषी खात्याचे कर्मचारी हा प्रशासनातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेणे आवश्यक आहे. सर्वजण २८ फेब्रुवारी पासून शांततामय मार्गाने आंदोलन करीत असून २३ मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर सकारात्मक विचार करुन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे. 

Leave Comments