By Editor on Friday, 21 April 2023
Category: Press Note

आदिवासी महिलांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीवरून खा. सुप्रिया सुळे संतापल्या

महिला आणि आदिवासींविषयी राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप

पुणे : पालघर पोलिसांकडून आदिवासी महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीवरून खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महिलांना विवस्त्र होईपर्यंत मारहाण करणं हा असंवेदनशीलतेचा कळस असून आदिवासी आणि महिलांविषयी हे सरकार किती उदासीन आहे हे दर्शविणारी आहे, अशा खरमरीत शब्दात त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

सुळे यांनी याबाबत ट्विट करत आदिवासींचा जगण्याचा आणि राहण्याचा संवैधानिक हक्क कोणत्याही परिस्थितीत डावलला जाता कामा नये ही आमची भूमिका आहे, अशा शब्दात राज्य सरकारला सुनावले आहे. मुंबई-बडोदा महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी पालघर पोलीसांनी आदिवासी महिलांना अक्षरशः विवस्त्र होईपर्यंत अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना असंवेदनशीलतेचा कळस असून आदिवासी आणि महिलांविषयी हे सरकार किती उदासीन आहे हे दर्शविणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास करुन दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आदिवासी बांधवांचा विरोध असतानाही त्यांच्या जमीनी पोलीसी बळाचा वापर करून अधिग्रहित का केल्या जात आहेत? असा सवाल उपस्थित करत त्यांचा जगण्याचा आणि राहण्याचा संवैधानिक हक्क कोणत्याही परिस्थितीत डावलला जाता कामा नये ही आमची भूमिका आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

Leave Comments