भल्या सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत गडाच्या पायथ्याला पोहोचलेल्या खासदार सुळे या या सर्वांच्या सोबत दोन अडीच तासात गडावर पोहोचल्या. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हाच किल्ला सर्वप्रथम जिंकून घेत स्वराज्याचे तोरण बांधले. आपली उंची, बेलाग कडे, अवघड वाट, आणि गडावरील विस्तीर्ण परिसरामुळे आधीचा प्रचंडगड म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला शिवरायांनी जिंकून घेतल्यानंतर त्याचे 'तोरणा' हे नाव झाले.
या किल्ल्यावर चढून जाताना खासदार सुप्रिया सुळे यांनी गडाची स्वच्छता आणि निगा राखण्याबाबत आवाहनही केले. गडाच्या वाटेवर आणि वर सुद्धा कचराकुंड्या ठेवल्या आहेत. त्या पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. याबरोबरच गडावर येणाऱ्या समस्त शिवप्रेमींनी कचरा अन्यत्र न टाकता तो कचरा कुंडीतच टाकावा, किंवा स्वतःबरोबर खाली घेऊन यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गडावर ताक, दही आणि लिंबू पाणी विकणाऱ्या सखुबाई ढेभे यांची विचारपूस करत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याकडील सरबतचा आस्वादही घेतला. याबरोबरच विदर्भातून आलेला तरुणांचा एक ग्रुप त्यांना भेटला, त्यांची विचारपूस करत सांभाळून जाण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. त्यानंतर गडावरील सदरेवर एक फेरफटका मारून त्या खाली उतरल्या आणि आपल्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या.