अवघ्या सातव्या वर्षी शेकडो पदकांवर नाव कोरणाऱ्या चिमुकलीला स्केटिंग किटची भेट
पुणे : कोंढवा बुद्रुक येथील अवघ्या सात वर्षे वयाच्या हिंदरत्न कु. मनस्वी विशाल पिंपरे हिने स्केटिंग खेळात जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इतक्या लहान वयात शंभरावर सुवर्ण पदकासह अनेक पदकांवर आपले नाव कोरत तिने गिनीज रेकॉर्ड केले आहे. तिच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत खासदार सुप्रिया सुळे यांनी तिला पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुमारे दीड लाखाचे स्केटिंग किट भेट दिले.मनस्वी हिने काल आपल्या पालकांसह खासदार सुळे यांची भेट घेतली. तिने स्केटिंगमध्ये अनेक जागतिक किर्तीचे विक्रम केले आहेत. ती सर्वात लहान गिनिज वर्ल्ड रेकाॅर्ड होल्डर आहे. आत्तापर्यंत तिने वेगवेगळ्या स्केटिंग स्पर्धांत तब्बल ११४ सुवर्ण पदक, १६ रजत आणि १४ ब्राँझ मेडल पटकावली आहेत. याशिवाय ती नॅशनल स्केटिंग चॅम्पियन देखील आहे. मनस्वीला हिंदरत्न या पुरस्कारासह १७ विविध पुरस्कार मिळाले आहेत.
मनस्वी हिने नुकतेच सलग ३० किलोमीटर स्केटिंग करत अनोखा विक्रम प्रस्थापित केला असून युवा पिढीला खेळाचा एक सकारात्मक संदेश दिला आहे. मनस्वीला २०२६ साली राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक जिंकायचे आहे. यासाठी ती प्रशिक्षक विजय मलजी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. याचबरोबर तिला एशियन गेम्स, ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. तिच्या या स्वप्नांना बळ देण्यासाठी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खासदार सुळे यांच्या हस्ते इनलाईन स्केट किट भेट देण्यात आले. तसेच आजवरच्या कामगिरीबद्दल मनस्वी हिचे पालक आणि प्रशिक्षक यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या.