By Editor on Tuesday, 17 December 2024
Category: Press Note

भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र

 दिल्ली : उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अवघ्या चार किलोमीटर अंतरासाठी या भागातील नागरिकांना तब्बल नव्वद ते शंभर किलोमीटरचा वळसा पडत असल्याने याठिकाणी पूल अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली असून अर्थसंकल्पात तशी तरतूद व्हावी, असे या पत्रात नमूद केले आहे. आगोती ते गोयेगाव वाशिंबे हे अंतर वास्तविक अवघे ४ किलोमीटर आहे. तथापि उजनी जलशयामुळे या दोन गावांतील नागरिकांना भिगवण- टेंभुर्णी मार्गे वळसा मारुन रस्त्यामार्गे तब्बल ९० ते १०० किलोमीटर इतके अंतर प्रवास करुन जावे लागते. परिणामी येथील नागरीक पैसे आणि वेळेच्या बचतीसाठी होडीतून प्रवास करतात. परंतू हा प्रवास धोकादायक असून अनेकांना यापूर्वी यामध्ये जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे उजनी जलाशयात आगोती ते गोयेगाव -वाशिंबे दरम्यान पुल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षापासून होत आहे.

उजनी धरणाच्या निर्मितीनंतर या भागातील शेती संपन्न झाली असून केळी, डाळिंब, ऊस व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. त्यामुळे हा परिसर फ्रुट व शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. याशिवाय उजनी जलाशयावर देशी विदेशी पक्षी हजेरी लावत असल्याने पक्षीप्रेमीही तसेच पर्यटकही मोठ्या प्रमाणात या परिसरात येत असतात. त्यामुळे येथील कृषि पर्यटन, मासेमारी, साखर उद्योग, वनस्पती अभ्यास, नौकाविहार, जलपर्यटन यांना चालना देण्यासाठी आगोती ते गोयेगाव दरम्यान भीमा नदीवर पूलबांधण्याची गरज आहे, असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

उजनी धरण होण्यापूर्वी गोयेगाव ते आगोती दरम्यान नदी पात्रातून बैलगाडी द्वारे वाहतूक होत असे. सध्या याठिकाणी बोटीतून वाहतूक सुरू आहे. गोयेगाव ते आगोती दरम्यान भीमा नदीच्या पात्राची रुंदीही कमी असून दोन्ही किनाऱ्या पर्यंत रस्ते सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे जमीन संपादनाचीही आवश्यकता भासणार नाही. दोन्ही बाजूकडुन तीनशे ते चारशे मीटर पर्यंतचे भराव भरून मुख्य नदी पात्रात पूल झाल्यास येथील विकासाला निश्चित चालना मिळेल, तरी स्थानिक नागरिकांच्या सोयीचा विचार विचार करता याठिकाणी पूल बांधण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, असेही त्यांनी गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Leave Comments