By Editor on Saturday, 18 March 2023
Category: Press Note

हिंजवडी आणि माणसाठी पाणी, वाहनतळ आणि अन्य सुविधांबाबत खा. सुळेंची मागणी

पुणे : हिंजवडी आणि माण परिसरात पाणी साठवण टाक्या, पुरेसे वाहनतळ आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची गरज असून 'पीएमआरडीए'ने तशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबरोबरच माण येथे पोलीस चौकी उभारण्याबाबतही विचार व्हावा, असे त्यांनी म्हटले आहे.

पीएमआरडीए'कडे त्यांनी ट्विटद्वारे ही मागणी केली आहे. हिंजवडी आणि माण येथील बहुतांश सोसायट्यांना नळाने पाणीपुरवठा होत नसल्याने या सोसायट्यांना पाणी साठविण्यासाठी टाक्या, पंपींग स्टेशन, सामुदायिक विहीरी आदींची गरज आहे. यासंदर्भात 'पीएमआरडीए'ने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

माण येथे पोलीस चौकी उभारण्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून येथील नागरिक सातत्याने मागणी करीत आहेत. तथापि चौकीसाठी शासकीय जागा उपलब्ध न झाल्यामुळे ही मागणी अद्यापही प्रलंबित आहे. वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करता येथे पोलीस चौकी अतिशय गरजेची आहे. यासाठी पीएमआरडीएने जागा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी म्हटले असून मेट्रोच्या पार्श्वभूमीवर वाहनतळाची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.

या परिसरात मेट्रो सुरु झाल्यानंतर येथे दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी चार्जिंग पॉंइंटची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. 'पीएमआरडीए'ने याबाबत विचार करुन नियोजन करणे गरजेचे आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

जागांबाबत निर्णयाचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळावेत. सोसायटीच्या ॲमेनिटी स्पेसेस 'पीएमआरडीए'ला हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. या जागांच्या वापराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांकडे दिल्यास त्यांचा नागरीकांना अधिक फायदा होईल, अशी नागरिकांची मागणी असून याबाबत 'पीएमआरडीए'ने सकारात्मक विचार करावा, असेही सुळे यांनी म्हटले आहे. 
Leave Comments