गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि. २४) खासदार सुळे या इंदापूर दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी काही गावांत विकास कामांचे उदघाटन केले. काही ग्रामस्थांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कुंभारगाव ला भेट देऊन खास बोटीवरून फेरफटका मारत फ्लेमिंगो पक्षांचे निरीक्षण केले, पर्यटकांनी याठिकाणी भेट द्यावी, असे आवाहनही केले. याशिवाय या दौऱ्यातील त्यांची एका शाळकरी मुलाची भेट विशेष लक्षणीय ठरली.
संग्राम रामदास मोरे नावाचा हा छोटासा मुलगा, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. तो सुळे यांना भेटला; आणि आवर्जून त्या त्याच्यासाठी थांबल्या. हालगीवर सफाईदारपणे पडणारे त्याचे टिपरू आणि त्यातून निघणारा ताल खासदार सुप्रिया सुळे यांना आवडला नसता तरच नवल. वेळात वेळ काढून त्या काही वेळ थांबल्या, संग्रामला ताल धरायला लावला, सोबतच्या कार्यकर्त्यांकडे त्याचे भरभरून कौतुक केले. त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देत तो कोणत्या शाळेत जातो, कितविला आहे, याची आस्थेने चौकशी सुद्धा केली. इतकेच नाही, तर त्याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपल्या स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा व्हिडीओसुद्धा टाकला आहे. या व्हिडीओ वर लाईक्स चा पाऊस पडत असून नेटकरी संग्राम मोरे या चिमुकल्याचे भरभरून कौतुक करत आहेत.