राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरतीबाबत २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार परीक्षा झाल्या असून एक-दोन दिवसांत निकाल अपेक्षित आहे. परंतु या विभागात रिक्त असणाऱ्या जागांच्या तुलनेत भरती निघालेल्या जागांची संख्या अतिशय कमी आहे. त्या जागा किमान एक हजारापर्यंत वाढल्या तर परीक्षा दिलेल्या उमेदवार तरुणांना त्याचा फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
कोरोना व इतर काही कारणांमुळे गेली काही वर्षे जलसंपदा विभागामध्ये भरती होऊ शकलेली नाही. याशिवाय अनेक उमेदवार आता या परीक्षेनंतर वयाच्या अटींची पूर्तता करु शकणार नाहीत, हेही खासदार सुळे यांनी लक्षात आणून दिले आहे.