पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी
बारामती : बारामती तालुक्यातील अंजनगाव (कऱ्हावागज) येथे कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास ऐनवेळी निमंत्रण देण्यावरून खासदार सुप्रियाताई सुळे या नाराज झाल्या आहेत. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे आपली ही नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.बारामती लोकसभा मतदार संघाचे आपण लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे किमान २४ तास आधी निमंत्रण मिळाले, तर त्या अनुषंगाने दौऱ्याचे नियोजन करता येते त्यामुळे संबंधीत यंत्रणांनी योग्य तो प्रोटोकॉल पाळावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे आजच खासदार सुळे यांचा बारामती तालुका दौरा सुरू आहे. अंजनगाव येथील कार्यक्रमाबाबत त्यांना आधीच कल्पना असती, तर त्यानुसार त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करता आले असते, हेही त्यांनी आपल्या पत्रातून लक्षात आणून दिले असून हेच पत्र त्यांनी जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना पण पाठवले आहे.
अंजनगाव येथील कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आपल्याला थोड्या वेळापूर्वी मिळाली. या भागाचे आपण लोकप्रतिनिधी असून आपण स्वतः या भागाचे लोकप्रतिनिधी असून येथील जनतेचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आपले दौरे तथा कार्यक्रम पुर्वनियोजित असतात. तरीही महत्वपूर्ण सार्वजनिक कार्यक्रमाचे नियोजन किमान २४ तासांपुर्वी जरी केले आणि मला तशी कल्पना दिली तर आपल्या कार्यक्रमात तसा बदल करता येणे शक्य आहे. संबंधित यंत्रणांनी याची कृपया नोंद घ्यावी. लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.