By Editor on Saturday, 01 July 2023
Category: Press Note

महाविद्यालयीन प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यातील अडचणी दूर करा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे : सध्या महाविद्यालयीन प्रवेश सुरु आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आवश्यक आहेत. परंतु शासकीय यंत्रणांकडून विविध कारणांमुळे दाखले देण्यास उशीर होत आहे. शासनाने याची दखल घेऊन ही प्रक्रिया सुलभ आणि जलद करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेशदरम्यान जात, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअर, अधिवास आदी दाखले अत्यावश्यक असतात. त्यासाठी संबंधित मुलांसह त्यांचे पालकही सेतू केंद्रामध्ये चकरा मारत आहेत. तथापि सर्व्हर डाउन असण्यापासून अन्य वेगवेगळ्या अडचणी येत असून अर्जदार विद्यार्थ्यांचा खोळंबा होत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी, या दुर्गम तालुक्यांसह अन्य भागातून आणि खुद्द पुणे शहरातूनही अशा अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबतच्या बातम्याही वृत्तपत्रादी माध्यमांतून प्रसिद्ध होत आहेत. गेल्या आठवडाभरापासून हे प्रकार होत आहेत. याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत. तातडीने या अडचणी सोडवून विद्यार्थांची गैरसोय दूर करावी, असे त्यांनी म्हटले आहे.


महाविद्यालयांना देखील या दाखल्यांसाठी मुलांचे प्रवेश थांबवून ठेऊ नयेत. हमीपत्र घेऊन त्यांना प्रवेश द्यावेत. याबाबत शासनाने देखील अधिक गोंधळ टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. 

Leave Comments