पुणे : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रत्येक नागरिकाला सतावू लागला असून रुग्णवाहिकांना सुद्धा रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास अक्षम्य वेळ लागत आहे. यावर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित असा कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबरोबरच पिसोळीसह काही समाविष्ट गावांतील सांडपाण्याची व्यवस्था करण्याचीही त्यांनी पालिका आयुक्तांना आठवण करून दिली आहे.
कात्रज देहूरोड बाह्यवळण महार्गालगतच्या सुस गावात सनी वर्ल्ड ते लुपिन या सोसायट्यांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. आहे. रोजच्या कोंडीमुळे येथील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागात रुग्णवाहिका देखील पोहोचणे दुरापास्त झाले आहे. या भागातील स्थानिक नागरिकांनी सुळे यांच्याकडे वाहतूक कोंडीबाबत समस्या मांडल्या त्यानुसार सुळे यांनी पूर्ण शहरातीलच वाहतूक समस्या उधृत केली असून प्रशासनाकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
एकेकाळी पुण्याची हवा प्रसिद्ध होती, इथल्या शिक्षणाच्या दर्जाची चर्चा होत असे. सध्या मात्र पुण्याची वाहतूक कोंडी प्रसिद्ध होत आहे, असे सांगत शहरात प्रवेश करणारा एकही रस्ता विना-वाहतूक कोंडीचा राहिलेला नाही. एवढेच नाही तर शहरातील एक ना एक रस्त्यावर वाहनांची गर्दी तुंबलेली असते. याबाबत शासन आणि प्रशासनाने उपाय शोधणे गरजेचे आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन यांनी तातडीने एकत्रित बैठक आयोजित करुन पुण्यातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पिसोळीसह समाविष्ट गावे आणि परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाची दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन नादुरुस्त तसेच तुंबलेल्या अवस्थेत आहेत. रस्त्यावरुन वाहणाऱ्या सांडपाण्याचा या भागातील नागरीक या अतिशय गलिच्छ वातावरणाचा सामना करीत आहेत. त्यांना आरोग्यासह विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका आयुक्तांनी या विषयात तातडीने लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बोपदेव घाटातील खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक
कोंढवा ते सासवड रस्त्यावरील खडीमशीन ते बोपदेव घाट दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून गेल्या अनेक दिवसांत या रस्त्याची डागडुजीच झालेली नाही. या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठून त्याची स्थिती आणखी विदारक झाली आहे. परिणामी या भागात सातत्याने छोटे-मोठे अपघात घडत असून या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला आहे. त्यामुलर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी तातडीने या रस्त्याची डागडुजी करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.