पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) - खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि. ८) सकाळी 'आपला सिंहगड आपला अभिमान' अंतर्गत किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान घेण्यात येणार आहे. सकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास सुप्रिया सुळे या अभियानात सहभागी होणार असून जास्तीत जास्त गडप्रेमींनी याभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नरवीर सरदार तान्हाजी मालुसरे यांच्या बलिदानाची साक्ष देत उभ्या असलेल्या सिंहगडाला भेट देणाऱ्या इतिहास प्रेमी अभ्यासक तसेच पर्यटकांची संख्या प्रचंड मोठी आहे. शनिवार रविवार आदी सुट्टीच्या दिवशी ही संख्या काही हजारांच्या घरात जाते. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या गडप्रेमींमुळे प्लास्टिक आदी कचराही मोठ्या प्रमाणावर जमा होतो. त्यामुळे या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविणे अत्यावश्यक बाब आहे. इतकेच नाही, तर याठिकाणी कायमस्वरूपी काही उपाययोजना करता येईल याचाही विचार करण्याची गरज आहे.
ही गरज लक्षात घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्या गडावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले असून 'चलो सिंहगड' अशी सर्वांनाच साद घातली आहे. जास्तीत जास्त संख्येने शिवप्रेमी आणि गडप्रेमींनी या मोहिमेत सहभागी होऊन सिंहगडावरील संपूर्ण परिसर कचरा मुक्त आणि स्वच्छ कसा राहील यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले आहे.