By Editor on Friday, 30 December 2022
Category: Press Note

नवले पूल परिसर अपघातमुक्त करण्यासाठी सर्व संबंधीत संस्थांची एकत्रित बैठक बोलवा

खा. सुळे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे, दि. २८ (प्रतिनिधी) - पुणे-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल परीसरात सातत्याने अपघात घडत आहेत. हा परिसर कायमचा अपघातमुक्त करण्यासाठी याठिकाणी काही सुधारणा करणे गरजेचे आहे. या रस्त्याशी एनएचएआय, पुणे महापालिका, एमएसईबी, एमएनजीएल आणि पीएमआरडीए अशा एकापेक्षा जास्त संस्था सहभागी आहेत. या सर्व संस्थांची एकत्र बैठक घेऊन तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने या संस्थांची तातडीने एकत्रितपणे बैठक बोलवावी, असे त्या म्हणाल्या.


गेल्या महिन्यात झालेल्या भीषण अपघातानंतर खासदार सुळे यांनी लागलीच याठिकाणी भेट देऊन पाहणी करत जखमींची विचारपूस केली होती. त्यानंतर संसदेच्या अधिवेशनातही याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. दिल्लीहून पुण्यात येताच आज पुन्हा एकदा त्यांनी नवले पूल परिसरास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'या पुलासंदर्भात एनएचएआय, महापालिका आणि महावीतरणची लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत याबाबतच्या तांत्रिक अडचणी सोडविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. हा परिसर कायमचा अपघातमुक्त करण्यावर आमचा भर आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही सहकार्य करीत असून याबद्दल त्यांचे आपण आभार मानते'.

गेल्या महिन्यात या पुलावर मोठा अपघात झाला होता. त्यावेळी तातडीने घटनास्थळाला भेट देत खासदार सुळे यांनी ही बाब केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही लक्षात आणून देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. इतकेच नाही, तर यापूर्वीही अनेक वेळा नवले पूल परिसरात अपघात झाले असून सातत्याने हा मुद्दा खासदार सुळे या उपस्थित करत आहेत. संसदेतही अनेक वेळा त्यांनी याबाबत विचारणा करून अपघात घडू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय रस्ते महामंडळाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांकडे यांच्याकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
Leave Comments