राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलनात केंद्र सरकारवर सडकून टीका
पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्हाला आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच्या हक्कासाठी न्यायालयात दाद मागू, असा इशारा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्र सरकारला दिला. त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराघ्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, प्रवक्ते प्रदीप देशमुख, पंकज साठे, हरिदास शिंदे, मुणालिनी वाणी, भारती शेवाळे, आनंद सवाने, रणजित शिवतरे, आलीम शेख, त्रिंबक मोकाशी, कैलास मकवान, संभाजी होळकर, संतोष रेणुसे, संतोष घोरपडे, महादेव कोंढरे, काकासाहेब चव्हाण, माणिकराव झेंडे, अप्पासाहेब पवार, भरत झांबरे, मनाली भिलारे, सुषमा सातपुते यांच्यासह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, पुणे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवही या आंदोलनात सहभागी झाले होते. दिव्यांग बांधवाना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेले अनेक महीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांकरीता काहीच मदत केली जात नाही. याबाबत केंद्र सरकारपर्यंत आवाज पोहचवण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष आहे. आजचे आंदोलन कोणाच्याही विरूद्ध नसून जेष्ठ आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाने वयोश्री योजनेअंतर्गत तपासणीचा संपूर्ण देशात विक्रम केला आहे. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी ही योजना संपूर्ण पुणे जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थानिकांच्या खर्चातुन ही योजना संपुर्ण जिल्ह्यात राबवण्यात आली. वयोश्री योजनेचे तब्बल एक लाख दहा हजार, तर ADIP योजनेचे दहा हजार इतके लाभार्थी पाहून केंद्र शासनाला शंका आली. त्यामुळे तपासणीसाठी एक स्पेशल टिम पाठवण्यात आली होती. त्या टीमने सुद्धा लाभार्थी संख्या योग्य असल्याचे मान्य केले आहे.
साहित्य वितरण होत नसल्यामुळे आपण स्वतः केंद्रिय मंत्र्यांना साहित्य वितरण कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. त्यात पक्षीय राजकारण येऊ दिले नाही. कारण आपल्यासाठी दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांची सेवा महत्वाची आहे. असे असूनही इतर राज्यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधनांचे वाटप होत असून महाराष्ट्राला मात्र डावलण्यात येत आहे. अगदी महाराष्ट्रातही काही ठराविक जिल्ह्यात याचे वाटप झाले आहे. असे असेल, तर केंद्र सरकारची ही योजना देशातील दिव्यांगासाठी आहे की कुठल्या राजकीय पक्षासाठी आहे. याचा खुलासा व्हायला, अशी मागणी यावेळी खासदार सुळे यांनी केली.शिरूर आणि बारामतीला राष्ट्रवादीचे खासदार असल्यामुळे डावलण्यात येत आहे त्याचवेळी मावळ आणि पुणे शहरात त्यांच्याच पक्षाचे खासदार असूनही केवळ राजकारणासाठी त्या दोन खासदारांचा बळी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार स्मरणपत्रे पाठवली, मंत्र्यांच्या भेटी घेऊन मागणी केली, इतकेच नाही, तर प्रत्यक्ष लोकसभेतही अनेक वेळा प्रश्न उपस्थित करून हा विषय आपण केंद्र सरकारच्या लक्षात आणून आहे. सातत्याने आपला पाठपुरावा चालू आहे, तरीही आजपर्यंत याबाबर निर्णय न झाल्याने आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे, असे खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.
बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही दिव्यांगाना घरबसल्या प्रमाणपत्र पाठवतो. अशी सुविधा संपूर्ण देशात देशात फक्त आपल्याकडे आहे. ज्याच्यासाठी शासनाच्या योजना आहेत त्यालाच जर त्या मिळत नसतील तर त्यांचा उपयोग काय, असा सवाल करत सुळे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, ''याच केंद्र सरकारने, 'दिव्यांगाना लाभपासून वंचित ठेवणे गुन्हा आहे', असा कायदा केला आहे. तर मग हे केंद्र सरकार गुन्हेगार आहे. केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आता येत्या दोन दिवसात याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात दाद मागू; आणि त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषण करण्यावाचून गत्यंतर नाही, याची सरकारने नोंद घ्यावी". महात्मा गांधीजींची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जात आपल्याला दिव्यांगाना न्याय द्यायचा आहे. आणि तो मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.