By Editor on Friday, 25 August 2023
Category: Press Note

शरद पवार इन्स्पायर फेलोशीप'च्या तिसऱ्या वर्षीची घोषणा

आजपासून अर्ज करण्याचे खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन

पुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप'च्या तिसऱ्या वर्षीची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिपची सुरुवात करण्यात आल्याचे चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले.

याअंतर्गत कृषी ('शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर) , साहित्य ('शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर ') आणि शिक्षण ('शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन') या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फर्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशचे विवेक सावंत यांचे सहकार्य मिळत आहे. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत. आज या फेलोशिपच्या तिसऱ्या वर्षासाठीची घोषणा आम्ही करीत आहोत, असे सुळे यांनी स्पष्ट केले.

कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशीपसाठी https://sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर आजपासून २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत राज्यभरातून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करता येतील. आलेल्या सर्व अर्जांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत निवडप्रक्रिया पूर्ण होईल. निवड समितीच्या वतीने 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर' साठी ८०, 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशीप' साठी १० तर शरद पवार इन्स्पायर शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा एकूण १२० फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी केली जाईल. दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी फेलोशिप मिळालेल्या फ़ेलोंना फेलोशिप प्रदान केल्या जाणार आहेत. या उपक्रमाला पहिल्या वर्षापासून भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार तसेच पहिल्या व दुसऱ्या वर्षी फेलोशीप मिळालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. ते सर्वजण अतिशय उत्तमरीत्या काम करत असून त्यांचा वेळोवेळी नियमितपणे आढावा घेतला जात असल्याचे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.
Leave Comments