By Editor on Saturday, 14 January 2023
Category: Press Note

दौंड तालुक्यातील वरवंड येथे पोलीस चौकी स्थापित करावी

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

 दौंड, दि. १४ (प्रतिनिधी) - दौंड तालुक्यातील वरवंड हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. तसेच येथे पाटस, कुसेगाव, रोटी, पडवी, देऊळगाव, कानगाव, हातवळण, भांडगाव, कडेठाण व कुरकुंभ परिसरातील विद्यार्थी आणि नागरीक येत असतात. या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता वरवंड येथे पोलीस चौकीची गरज आहे, तरी लवकरात लवकर याठिकाणी चौकी स्थापित करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांच्याकडे खासदार सुळे यांनी ही मागणी केली असून नागरीकांच्या सुरक्षेसाठी वरवंड येथे पोलीस चौकी असणे अतिशय आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

​वरवंड हे मोठे गाव असल्याने येथील बाजारपेठही मोठी आहे. याशिवाय शाळा, लहानमोठी रुग्णालये आणि अन्य मानवी गरजेचे व्यवहार या गावात होतात. आसपसच्या पाटस, कुसेगाव, रोटी, पडवी, देऊळगाव, कानगाव, हातवळण, भांडगाव, कडेठाण व कुरकुंभ या गावांसह वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचा याठिकाणी मोठा राबता असतो. या सर्वांची सुरक्षा अत्यावश्यक बाब आहे. याशिवाय लहानमोठ्या तंटा, वाद अथवा अन्य सुरक्षाविषयक गोष्टींसाठी स्वतःची आपल्या गावातच पोलीस चौकी असावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तरी लवकरात लवकर याठिकाणी पोलीस चौकी स्थापित करण्यात यावी, असे सुळे यांनी म्हटले आहे.

Leave Comments