By newseditor on Friday, 02 March 2018
Category: खडकवासला विधानसभा

संसदेचे कामकाज बघायचयं? मग साधा सुप्रिया सुळेंशी संपर्क

पुणे : संसदेत खासदार कशा पद्धतीने काम करतात हे जवळून अनुभविण्याची सुवर्णसंधी बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना आता मिळणार असून तुम्हीही व्हा माझे थिंकटँक ही अनोखी मोहिम खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरु केली आहे.

या मोहिमेअंतर्गत इयत्ता दहावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे सर्व खासदार सुळे यांना थेट प्रश्न पाठवू शकणार आहेत. स्वतः सुप्रिया सुळे यांनीच विविध विषयांवरील प्रश्न विद्यार्थ्यांकडून मागविले असून त्यातील निवडक २५ प्रश्न त्या स्वतः लोकसभेत मांडणार आहेत. विशेष म्हणजे हे निवडक प्रश्न पाठविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या दिल्लीचा अभ्यासदौराही मोफत घडवून आणणार आहेत. या अभ्यासदौऱ्याअंतर्गत विद्यार्थ्यांना लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहाचे कामकाजही पाहता येणार आहे.

लोकशाही व्यवस्थेत संसद हा अतिशय महत्त्वाचा घटक असून त्याचे कामकाज कसे चालते, याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. विद्यार्थ्यांना ही संपुर्ण व्यवस्था समजावून घेता यावी. यासाठी ही मोहिम सुरु केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न https://askme.supriyasule.net  या बेबसाईटवर लवकरात लवकर पाठवावेत. हे प्रश्न पाठविताना आपले नाव, शाळा अथवा महाविद्यालयाचे नाव, संपूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांकही नोंदवावा, असे आवाहनही सुळे यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

  संसदेचे कामकाज बघायचयं? मग साधा सुप्रिया सुळेंशी संपर्क 

Leave Comments