लोकसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून 'लाडकी बहीण योजना' आणली आहे असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला लावला. माता भगिनींना मिळणारा हा लाभ सरकार खिशातून देणार नाही. लवकरच हे सरकार बदलणार आहे आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेचा लाभ दुप्पट करण्यात येईल असेही आश्वासन सुळे यांनी उपस्थित महिलांना दिले. बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे व पूजा पारगे यांच्या वतीने खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कोंढणपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'सिंहगडाच्या निष्ठावंत शिलेदारांचा आभार मेळावा' या कार्यक्रमात सुळे बोलत होत्या.