सिंहगड : खासदार सुप्रिया सुळे यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सिंहगडावर स्वच्छता मोहिम राबवत वाहनतळ ते नरवीर तानाजी मालुसरे समाधी पर्यंतचा मार्ग व लगतच्या परिसराची स्वच्छता केली. यावेळी काही समाजसेवी संस्था व दुर्गप्रेमीही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे सिंहगडावर दाखल झाल्या होत्या. वन विभागाने स्वच्छता मोहिमेसाठी तयारी करत अगोदरच आवश्यक साहित्याची जमवाजमव करून ठेवली होती.
गाडीतळापासून सुळे यांनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात करत रस्त्याच्या कडेने पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, कागद व इतर कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. गाडीतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीपर्यंत सुप्रिया सुळे या पुर्णवेळ कचरा गोळा करत होत्या.
कचरा गोळा करताना सुळे कार्यकर्ते व पर्यटकांशी संवाद साधत गडाचे पावित्र्य राखण्याबाबत आवाहन करत होत्या. दरम्यान अनेक तरुण, तरुणी, नागरिक सुप्रिया सुळे यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह करत होते त्याला सुळे यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत होता.
यावेळी काका चव्हाण, त्र्यंबक मोकाशी, नवनाथ पारगे, शुक्राचार्य वांजळे, पूजा पारगे, सायली वांजळे, डॉ. नंदकिशोर मते,सुभाष हगवणे, शरद दबडे, आनंद मते, सुरेखा दमिष्टे, खुशाल करंजावणे, नरेंद्र हगवणे,साहिल कांबळे, सुरेश गुजर आदी उपस्थित होते.
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांची कार्यकर्त्यांसह सिंहगडावर स्वच्छता मोहिम | Sakal