By Editor on Thursday, 02 March 2023
Category: इंदापूर

[Maharashtra Times]रविंद्र धंगेकरांचा विजय हा दडपशाही विरोधातील एल्गार : सुप्रिया सुळे

बारामती : कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे रविंद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. धंगेकर यांच्या विजयाबाबत भाष्य करताना सुळे म्हणाल्या की, "सत्ताधारी पक्षाने साम-दाम-दंड-भेद वापरून विजय मिळावा असा चंग बांधलेला असताना या दडपशाही विरोधातील हा कल आहे", असं म्हणत सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

तसेच "कसबा मतदारसंघात पैसे वाटपाचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला होता. मात्र, सुसंस्कृत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार झालेल्या मराठी माणसाने सध्याच्या दडपशाहीला आणि पैसे वाटण्याच्या संस्कृतीच्या विरोधातील हा एल्गार आहे", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. सुळे या आज इंदापूरमध्ये आल्या होत्या त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

"जर मताचे विभाजन झाले तरच भारतीय जनता पार्टी निवडून येते. चिंचवडमधील भाजपची आघाडी ही त्यामुळेचं आहे. सर्वसामान्य जनता ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करते. हे पक्षाच्या विरोधात नसून त्यांनी राबवलेली धोरणे, महागाई याच्या विरोधातील जनतेचा हा कल आहे", असेही सुळे यावेळी म्हणाल्या

"देश हा संविधानाप्रमाणे चालला पाहिजे तो हुकूमशाहीने चालता कामा नये. पारदर्शक कारभार आणि संविधानाच्या चौकटीतून निवडणुका झाल्या पाहिजेत", अशी प्रतिक्रिया देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Supriya Sule Reaction, रविंद्र धंगेकरांचा विजय हा दडपशाही विरोधातील एल्गार : सुप्रिया सुळे - supriya sule reaction after ravindra dhangekar win - Maharashtra Times

Leave Comments