By newseditor on Friday, 09 February 2018
Category: देश

सुप्रिया, राहुलसह 28 खासदारांना सर्जिकल स्ट्राईकची माहिती देणार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची इत्यंभूत माहिती 28 खासदारांनी देण्यात येणार आहे. या 28 जणांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे.

परराष्ट्र सचिव आणि डीजीएमओ दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीला माहिती देतील. काँग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत राहुल गांधी, वरुण गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह 28 खासदारांचा समावेश आहे.

लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समितीची मंगळवारी बैठक होईल. या बैठकीत परराष्ट्र सचिव, संरक्षण सचिव आणि लष्करी कारवाईचे महासंचालक (डीजीएमओ) हे खासदारांना सर्जिकल स्ट्राइकबाबत माहिती देतील. संसदीय समितीला अशी माहिती देण्यास सरकारने आधी नकार दिला होता.

उरी हल्ल्याच्या बदल्यावरुन देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक रणकंदन सुरु झालं होतं. मोदी सरकार जवानांच्या बलिदानाची दलाली करत असल्याचं विधान खुद्द राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे या कारवाईची गरज आणि त्यानंतर त्याच्या प्रसिद्धीची गरज का होती? हे सरकारतर्फे विषद केलं जाईल

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 28 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी सरकारला पाठिंबा दर्शवला होता. मात्र अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्ट्राईकबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

Leave Comments