By Editor on Thursday, 15 December 2022
Category: देश

'या' कारणासाठी सुप्रिया सुळेंनी मानले अमित शाहांचे आभार

म्हणाल्या, त्यांनी आम्हाला..

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बोलवलेल्या विशेष बैठकीत मराठी माणसाचा अपेक्षाभंग झाला. कर्नाटककडून सीमाभागांतील मराठी बांधवांवर होणारे हल्ले आणि अत्याचाराबद्दल अमित शाह हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सक्त ताकीद देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं काहीच झालं नाही.

​न्यायालयाचा निकाल येईपर्यंत दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या भूभागावर हक्क सांगू नये यावर या बैठकीत सहमती झाल्याची माहिती अमित शाह यांनी बैठकीनंतर दिली. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत 'जैसे थे' अशीच परिस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष नलीन हेसुध्दा उपस्थित होते.

गृहमंत्री अमित शाहांच्या सीमावादाच्या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिलीय. आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी अमित शाहंचे आभार मानले आहेत. सुळे म्हणाल्या, 'अमित शाहांनी आम्हाला वेळ दिला आणि आमच्या सविस्तर मागण्या ऐकून घेतल्या, त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. शांततेच्या मार्गानी सीमावादाचा प्रश्न पुढं गेला पाहिजे, ही सातत्यानं महाराष्ट्राची भूमिका राहिलेली आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत (सीमावाद) काही बोललं नसतं, तर हा विषयच झाला नसता.'

एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस आठवड्याभरांनी सांगतो की, ते ट्विट फेक होतं. आता जे काही झालं आहे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. हा राज्याचा विषय आहे. हा कुठला राजकीय विषय नाहीये. हा अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील विषय आहे, याकडं आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. चर्चेतून आणि शांततेच्या मार्गानी सीमा प्रश्न सुटू शकतो, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

'या' कारणासाठी सुप्रिया सुळेंनी मानले अमित शाहांचे आभार; म्हणाल्या, त्यांनी आम्हाला.. I Supriya Sule | Sakal

Leave Comments