By Editor on Wednesday, 07 February 2024
Category: देश

[Maharashtra Times]आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळे हसत हसत म्हणाल्या

घर बापाचं होतं पण त्यांनी बापालाच घराबाहेर काढलं...

मुंबई : निवडणूक आयोगाने शरद पवारांना धक्का दिला आहे. पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळालं आहे. यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर मी हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. आता यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाले की, ज्या माणसाने पक्ष स्थापन केला, त्याच्याकडून पक्ष काढून घेतला. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झालं असेल. मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण हे अपेक्षित होतं. हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष, त्यांच्यासोबत देखील असंच केलं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा देखील मराठी माणसाचा पक्ष आहे. मराठी माणसाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश शक्ती जे निर्णय घेत असतील त्याचं हे आणखी एक उदाहरण आहे. त्यामुळे मला या गोष्टीचं काहीही आश्चर्य वाटत नाहीय, असं सुप्रिया सुळेंनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांच्या आगे-मागे कोणी नव्हतं. त्यांनी देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात स्वत:ची ओळख स्वत: निर्माण केली आहे. ही ओळख सहा दशकं राहिलेली आहे. त्याचं श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या आणि देशाच्या माय-बाप जनतेला जातं. त्यामुळे जोपर्यंत ती माय-बाप जनता आमच्याबरोबर आहे, तोपर्यंत आम्हाला कुठलीच काळजी करण्याचं काम नाही.

जी ऑर्डर शिवसेनेच्या विरोधात निघाली, तीच ऑर्डर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात निघाली. जे षडयंत्र बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात झालं तेच शरद पवारांसोबत झालं. शरद पवार यांनी सर्व राजकीय आयुष्य शून्यातून उभं केलं आहे. त्यांचे कोणी काका, मामा राजकारणात नव्हते. त्यांनी स्वत: तो पक्ष उभा केला आहे. शून्यातून निर्माण केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेला आहे. घर वडिलांचं आणि त्यांनी वडिलांनाच बाहेर काढलं. फडणवीसांनी अजित पवारांबरोबर अदृश्य शक्तीचंही अभिनंदन करावं. आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि पुन्हा उभे राहू, असा आत्मविश्वासही सुप्रिया सुळेंनी दर्शवला आहे. 

Ajit Pawar Group Gets Party Symbol and Name Supriya Sule Reaction; आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळे हसत हसत म्हणाल्या, घर बापाचं होतं पण त्यांनी बापालाच घराबाहेर काढलं... | Maharashtra Times

Leave Comments