By Editor on Thursday, 21 September 2023
Category: देश

[divya marathi]'बहिणीचे कल्याण बघतील असे भाऊ प्रत्येक घरात असतातच असे नाही'

महिला आरक्षणावर संसदेत चर्चा करताना सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

ऐतिहासिक असे महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. मात्र, त्यापूर्वी जवळपास 60 खासदारांनी या विधेयकावर आपले मत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विधेयकावर आपली मते मांडताना भाजपवर टीकास्त्र सोडले. मात्र, यादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे. 'प्रत्येक बहिणीचे नशिब एवढे चांगले नसते की तिला आपले कल्याण बघणारा भाऊ मिळेल', असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याचा संदर्भ आता अजितदादांच्या बंडाशी लावला जात आहे.

अमित शहांना टोला

​खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले होते की, मणिपूरमधील कुकी महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असे नाही. पुरुषही बोलू शकतात. आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो. याचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंनी शहांना चांगलाच टोला लगावला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येक घरात असे भाऊ असतातच असे नाही की जे बहिणीचे कल्याण बघतील. प्रत्येकाचे नशीब एवढे चांगले नसते.

चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तारांवर निशाणा

​चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपच्या एकेकाळी प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याने मला ऑन कॅमेऱ्यावर घरी जाऊन जेवण बनवण्यास सांगितले होते. ही भाजपची प्रवृत्ती आहे. दुसऱ्या एका मंत्र्याने माझ्याबद्दल ऑन कॅमेरा अपशब्द वापरले. त्यामुळे भाजपने उत्तरे दिली पाहिजेत. तुमचे मंत्री वैयक्तिक टिप्पणी लोकांमधून निवडून आलेल्या महिलेबद्दल बोलतात. मी त्याच्यावर प्रतिक्रिया देखील दिली नव्हती, ती द्यायचीदेखील गरज नव्हती.

विशेष अधिवेशनाची गडबड कशासाठी?

जनगणना आणि मतदारसंघ फेररचना झाल्यानंतर हे आरक्षण लागू होणार आहे तर संसदेच्या विशेष अधिवेशनाची गडबड का करण्यात आली. या दोन्ही गोष्टी कधी होतील माहिती नाही तर आरक्षण कधी लागू होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, देशातील सर्व वृत्तपत्रांनी महिला आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व सरकारांबद्दल लिहिले आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लीम आरक्षण हे प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत, त्यावरदेखील संसदेत चर्चा व्हावी. कांदा, दुष्काळ असे प्रश्नदेखील महत्त्वाचे आहेत, त्यावरदेखील चर्चा व्हावी.

एससी, एसटी, ओबीसी महिलांचे काय?

​सुप्रिया सुळे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. महात्मा फुले यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. महिला धोरणाची सुरुवात राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसनं केली. माझे वडील शरद पवार यांनी 33 टक्के महिला आरक्षण पंचायत राजमध्ये लागू ते महाराष्ट्र राज्य होते, याचा अभिमान वाटतो.​​​​​​ महिला आरक्षण विधेयकातून ​एससी, एसटी आणि ओबीसी महिलांसाठीदेखील आरक्षण द्यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

supriya sule in loksabha on woman reservation bill | महिला आरक्षणावर संसदेत चर्चा करताना सुप्रिया सुळेंचे वक्तव्य - Divya Marathi

Leave Comments