By Editor on Wednesday, 20 September 2023
Category: देश

[sarkarnama]महिलांबाबत भाजपची मानसिकता काय, हे चांगलंच माहीत

सुप्रिया सुळेंनी सांगितले दोन किस्से

नव्या संसदेत प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी नारी शक्ती वंदन विधेयक मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना धक्का दिला. या विधेयकाला लोकसभेत इंडिया आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या विधेयकाच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच भाजपच्या काही मंत्र्यांचा महिलांप्रती असलेल्या मानसिकतेचाही समाचार घेतला.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने महिला विधेयक संसदेत मांडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. एकीकडे महिलांना आरक्षण देण्यावर चर्चा करायची आणि दुसरीकडे महिलांप्रती अपमानास्पद वक्तव्ये करायची, अशी भाजपची मानसिकता असल्याची टीक खासदार सुळेंनी केली. विरोधकांनी काही बोलले तर त्यांना धारेवर धरता, मग भाजपच्या मंत्र्यासह काही प्रमुख नेत्यांनी महिलांबाबत केलेल्या विधानांचे काय, असा प्रश्नही सुप्रिया सुळेंनी भाजपला केला.

इंडिया (INDIA) आघाडीतील पक्षांवर सत्ताधारी आरोप करतात की, आम्ही महिलांना संधी देत नाही. त्यांना पुढे जाण्यापासून रोखत आहोत. याला उत्तर देताना काही नेत्यांच्या वक्तव्याच्या दाखल देत सुळेंनी भाजपवर कडाडून टीका केली. सुळे म्हणाल्या, 'महाराष्ट्राच्या एका भाजप राज्य प्रमुखाने मला महिला म्हणून हिणवले होते.

सुप्रिया सुळेंनी सांगितले, 'महाराष्ट्र भाजपचे प्रमुख असलेल्या एका नेत्याने ऑन कॅमेरा म्हटले होते की, सुप्रिया सुळे घरी जा, स्वयंपाक करा, देश आम्ही चालवतो. यातूनच भाजपची मानसिकता काय आहे, हे स्पष्ट होते. तसेच भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनीही माझ्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. इंडिया आघाडीतील लोकं काही बोलले तर त्यांच्यावर टीका होते. मात्र, भाजपच्या व्यक्तींकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबाबत वैयक्तिक टिप्पणी करतात, हे तुम्हाला कसे चालते? याचे उत्तर द्यावे.'

महिलांबाबत भाजपची मानसिकता काय, हे चांगलंच माहीत; सुप्रिया सुळेंनी सांगितले दोन किस्से | Supriya Sule Attack on BJP Leaders for personal comment on women

Leave Comments