लम्पी आजारामुळे देशातील पशुधन आणि दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. सुमारे ३० लाख जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली असून, दीड लाखांहून अधिक जनावरे दगावली आहेत. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासोबतच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचारही करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत केली. खासदार सुळे यांनी महाराष्ट्रासह देशभरात लम्पी आजारामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. या आजारामुळे हजारो शेतकऱ्यांनी पशुधन गमावले आहे. शिवाय, त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.
परिणामी दुग्धव्यवसाय अडचणीत आला असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान लक्षात घेता सरकारने मदत करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच मोफत उपचारही देण्याची गरज आहे. लम्पीचा प्रत्येक वेळी नवा विषाणू येत असल्याचे पशुतज्ज्ञांचे म्हणणे याचा अर्थ हा किती घातक आजार आहे, ते लक्षात घ्यायला हवे. या रोगावर एकच लस प्रभावी ठरत नाही. त्यामुळे या रोगाचे आणखी संशोधन होऊन प्रभावी लस तयार केल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
देशातील स्थिती
लम्पीग्रस्त जनावरे : २९ लाख ५२ हजार २२३
दगावलेली जनावरे : १ लाख ५५ हजार ७२४
महाराष्ट्रातील स्थिती
लम्पीग्रस्त जनावरे : ३ लाख ९५ हजार ४२६
दगावलेली जनावरे : २८ हजार ३७
लम्पी रोगाबाबत उपचार
पशुसंवर्धन विभाग टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८
राज्यस्तरीय कॉल सेंटर टोल फ्री क्रमांक १९६२
Supriya Sule : लम्पीपीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी - सुप्रिया सुळे | Sakal