By newseditor on Tuesday, 14 August 2018
Category: देश

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी




सकाळ वृत्तसेवा सोशल मीडियावर बदनामी


पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एका फेसबुक पेजवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुप्रिया सुळे यांची बदनामी करणारा मजकूर टाकला जात आहे. याबाबत सुळे यांनी सोमवारी डॉ. व्यंकटेशम यांची भेट घेतली. पक्षाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांवर राजकीय विरोधातून टीका जरूर करावी; मात्र त्यांच्याबाबत फेसबुक पेजवर वैयक्तिक पातळीवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून त्यांची बदनामी केली जात आहे. मजकुरामध्ये बदल करण्यापासून ते छायाचित्रांमध्येही फेरबदल केले जात आहेत. त्यामुळे संबंधित फेसबुक पेज चालविणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी सुळे यांनी केली.
पक्षनेत्यांनी किंवा मी स्वतः कधीही, कुठेही न बोललेली विधाने तयार करून ती जाणीवपूर्वक सगळीकडे पसरविली जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरत आहे. परिणामी आमच्या प्रतिमेचे हनन होत असून, हा प्रकार गंभीर आहे.
- सुप्रिया सुळे, खासदार
http://www.esakal.com/pune/ncp-senior-leader-slander-social-media-supriya-sule-137581
Leave Comments