By newseditor on Monday, 13 August 2018
Category: देश

खा. सुप्रिया सुळेंची पोलिस आयुक्‍तांकडे तक्रार



हाताची घडी, तोंडावर बोटवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


सोशल मिडियावरून बदनामी : खा. सुप्रिया सुळेंची पोलिस आयुक्‍तांकडे तक्रार
हाताची घडी, तोंडावर बोटवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुणे, दि. 13 – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सोशल मिडीयावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी आज पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. मागील काही दिवसांपासून हाताची घडी, तोंडावर बोट या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दात बदनामी केली जात आहे. त्या छायाचित्रासहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची आज सकाळी भेट घेऊन सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह स्वत: सुप्रिया सुळे, अजित पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत आक्षेपार्ह शब्दात टीका केली जात आहे. राजकीय विरोधातून टीका करण्यास काहीही हरकत नाही; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनामीकारक शब्द वापरले जात आहेत. मजकुरात बदल करणे, फोटो मॉर्फिंग करणे असे प्रकार केले जात आहेत. फेसबुकवर हाताची घडी, तोंडावर बोट नावाचे एक पेज आहे. या पेजवरून ही बदनामी केली जात आहे. त्यामुळे हे पेज चालविणारे, त्यावर मजकूर टाकणारे आणि त्याचे ऍडमिन जे कोणी असतील त्या सर्वांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
आमच्या नेत्यांनी अथवा मी कधीही कुठेही न बोललेली विधाने तयार करून ती आमचीच आहेत, असे भासवत राज्यातील आणि देशभरातील जनतेमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. त्यासाठी फोटो मॉर्फ केले जात आहेत. या प्रकारामुळे माझ्या पक्षाचे अध्यक्ष, पक्षातील मान्यवर नेते आणि माझी बदनामी केली जात आहे. यामुळे आमच्या प्रतिमेचे हनन होत आहे. हा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सचिवांना याबाबत माहिती देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF/
Leave Comments