खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा
पिंपरी : आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातील रस्त्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी, "आयटी पार्क हिंजवडी, मान, मारुंजी येथील रस्ता, वाहतूक कोंडी आणि जल कोंडी सारख्या पायाभूत समस्या सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी मला अजूनही हवा तसा वेळ दिला नाही, " असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
कंपेटेंट ऑथॉरिटी नेमण्यात यावी : "आयटी पार्क हिंजवडी, मान आणि मारुंजी येथील पायाभूत समस्या सोडवण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली आहे, अशी मला माहिती मिळतेय. त्याविषयी मी त्यांचे आभारी आहे. मात्र, आयटी पार्क आणि त्या भोवती असलेल्या गावाच्या पायाभूत समस्या सोडवण्यासाठी एक कंपेटेंट ऑथॉरिटी नेमण्यात यावी," अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसंच, "आयटी पार्कच्या परिसर हा महापालिकेत जावा किंवा नाही, याविषयी जो पण लोकहिताचा निर्णय या भागातील लोकप्रतिनिधी घेतील. त्या मताशी मी सहमत आहे," असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.
...अन्यथा पुढची भूमिका आम्ही ठरवू : "आम्ही या भागातील संबंधित यंत्रणांना 26 जुलैपर्यंतची म्हणजेच तीन आठवड्याची मुदत दिली आहे. या तीन आठवड्यात या भागातील संबंधित शासकीय यंत्रणांनी पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी आमची मागणी आहे. आमचे पायाभूत सुविधांचे प्रश्न तीन आठवड्याच्या आत मार्गी लागले तर आम्ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करू, अन्यथा पुढची भूमिका आम्ही ठरवू," असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
...तर अगदी मनापासून मला आनंद : "राज्य आणि देशाच्या राजकारणात फक्त ठाकरे कुटुंबीय नव्हे तर बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेतील प्रत्येक सदस्याचा तेवढाच वाटा आहे. त्यामुळं जर अशा कुटुंबातील दोन भावंडं एकत्र येत असतील तर त्याचा अगदी मनापासून मला आनंद आहे. आपण सर्वांनी देखील त्याचं स्वागत करायला हवं, " अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली. तसंच, "एकीकडं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही. आम्ही आमच्या कामात व्यस्त आहोत," असं स्पष्टीकरण देखील सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर दिलं आहे.
पूर्णतः भाजपा सरकार जबाबदार : दरम्यान, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गुन्हेगारीच्या घटनेत झालेल्या वाढीला पूर्णतः भाजपा सरकार जबाबदार असल्याचं स्पष्ट विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या म्हणाल्या की, "पुण्यातील कोंढवा परिसरात परवा महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मी सुद्धा केंद्र सरकारच्या गुन्हेगारी विषयाच्या संबंधित असलेल्या कमिटीवर सदस्य आहे. त्यामुळं राज्यात गुन्हेगारीत वाढ होत आहे, अशी आकडेवारी आम्हाला स्वतः केंद्र सरकारनं दिली आहे," असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
"आयटी पार्क हिंजवडी परिसरातील समस्या तीन आठवड्यात सोडवा, अन्यथा...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा