सुप्रिया सुळे यांची नितिन गडकरी यांच्याकडे मागणी, वाहतूक कोंडी सुटणार?
पुणे : मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रस्ता रुंदीकरणास वाव नसल्याने बाह्यवळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी बाह्यवळण रस्ता करावा. तसेच घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडे सुळे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली असून तसे ट्वीटही केले आहे. भूगाव व घोटावडे फाटा येथून पुणे ते कोलाड हा राष्ट्रीय महामार्ग जातो. येथील भूगाव या ठिकाणी मंदिर व गावठाण असल्याने रस्त्याच्या रुंदीकरणास वाव नाही. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. भूगाव येथे बाह्यवळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
त्याचबरोबर घोटावडे फाटा या ठिकाणी रीहे खोरे, मुठा खोरे, धरण भागातून (पौड) तसेच पुण्याकडून येणारी वाहने यामुळे चौफुला तयार होत आहे. येथे उड्डाण पूल केल्यास वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य आहे. यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. तरी यासंदर्भात सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा, असे सुळे यांनी नमूद केले आहे.
घोटावडे फाटा येथे उड्डाणपुल तयार करण्याची मागणी - Maharashtra Khabar