खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा...": सुप्रिया सुळे
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करताना मोठा गौप्यस्फोट केला होता.यावरून आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी भाष्य केले असून, देवेंद्र फडणवीसांकडून अशी अपेक्षा नव्हती, असे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे विधान हास्यास्पद आहे. दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या विधानावर सविस्तर बोलले आहेत. देवेंद्रजी आपस ये उम्मीद न थी अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग, धायरीत गोळीबार झाला अशा घटना घडल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी यावर बोलणे अपेक्षित होते. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशी परिस्थिती त्यांनी यावर बोलावे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल. अजित पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल. भाजप कोणाला उमेदवारी देणार हे माहिती नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. बिनविरोध निवडणुकीबाबत मी तर्कवितर्क लावू शकत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारणा करण्यात आली. यावर, देवेंद्र फडणवीस नेमके काय बोलले हे मी ऐकलेले नाही. मात्र, त्यांनी जो आरोप केला आहे, तसा कोणताही प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात झाला नाही. फडणवीस हे त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे बोलले असतील. मात्र, मला जी माहिती आहे, त्यानुसार तेव्हाच्या राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नव्हता, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.