सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके देखील अहमदनगर येथे आंदोलनास बसले आहेत. तर लंके यांच्या नेतृत्वात \"शेतकरी जन आक्रोश\" आंदोलनाचा रविवार (ता.७) तिसरा दिवस आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार निशाना साधत टीका केली आहे. राज्यासह केंद्रातील ट्रीपल इंजीन सरकार असंवेदनशील असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. सुळे बारामतीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यावेळी बोलत होत्या.
खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली मविआचे शेतकरी जन आक्रोश आदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा तिसरा दिवस असून अद्याप याची दखल सरकारने अथवा जिल्हा प्रशासनाने घेतलेली नाही. यावरून खासदार सुळे यांनी सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. सुळे म्हणाल्या, अर्थातच सरकारने यावर तोडगा काढला पाहिजे. पण राज्यासह केंद्रातील सरकार असंवेदनशील आहे. अद्याप सरकारमधील किंवा प्रशासनातील कोणीच याची जबाबदारी घेतलेली नाही..
माझी लंके यांना विनंती आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आपण नक्कीच तोडगा काढू. पण लंकेंनी आपल्या तब्बेतची काळजी घ्यायला हवी. तर राज्यातील महायुतीचे सरकार शेतकरी आणि महिलांच्या बाबतीत देखील किती संवेदनशील आहे हे सांगण्याची गरज नाही, असा टोला सुळे यांनी लगावला आहे.
तर राज्यासह केंद्रातील सरकार हे जुमलाबाज सरकार असल्याची टीका सुळे यांनी केली आहे. तसेच महागाई बेरोजगारी वाढत चालली आहे. राज्यात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. राज्यात वीज, अन्न, भाजी, पेट्रोल या सगळ्या गोष्टीच महाग आहेत. सगळ्या गोष्टीत राजकारण करायचं नसतं. त्यामुळे पॉलिसी म्हणून देखील काही गोष्टींकडे गांभीर्याने पाहावं लागतं. नक्की काय प्रस्ताव केलाय याबाबत मी माहिती घेऊन बोलेन असेही सुळे यांनी म्हटले आहे.