आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकारवर जोरदार हल्ला
धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. मराठा, धनगर, मुस्लिम व लिंगायत आरक्षणासाठी राष्ट्रवादी कायम या समाजासोबत असून येत्या अधिवेशनात संसदेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्या म्हणाल्या. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे. अंतरवाली सराटीत आंदोलकांना अमानुष मारहाण झाली. जरांगे पाटील यांच्याबाबत काय केले हे राज्याने पाहिले असेही सुळे म्हणाल्या.
सुळे पुढे म्हणाल्या, चौंडीतील उपोषणावेळी सरकारने ५० दिवसांचा कालावधी मागून घेतला होता. आता तीन दिवस त्यासाठी उरले आहेत. या तीन दिवसांचा कालावधी बारामतीतील आंदोलकांनी सरकारला द्यावा. तोपर्यंत उपोषण स्थगित करावे असे मी त्यांना सांगितले. परंतु, राज्य सरकार असंवेदनशील असल्याने आंदोलकांशी कोणी अद्याप चर्चा केली नाही. मी भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर मी ही बाब घालणार आहे.
राज्यात आरक्षण देणार असे म्हणणारा भाजप हा दिल्लीत आरक्षणाला विरोध करतो. भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी असून त्यांनी आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट कऱण्याची गरज आहे. आरक्षणाचा प्रश्न एक दिवसीय अधिवेशन घेवून ते संपवू शकतात. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येवून पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असा शब्द धनगर समाजाला दिला होता. परंतु त्याला दशक लोटले तरी हा प्रशअन सुटला नाही. दिल्लीमध्ये मी या विषयी केंद्रीय मंत्री अर्जून मुंडा यांची भेट घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
दिवाळी पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का, या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या, त्यांची प्रकृती कशी आहे, हे आपणाला माहित आहे. त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यास परवानगी नाही. ते मास्क वापरत आहेत. त्यामुळे डाॅक्टर सांगतील त्यानुसार ते यायचे की नाही हे ठरवतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटले. त्यांच्या भेटीत काय झाले हे मला माहित नाही. मला मतदारसंघातील प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यात आता निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहे. त्या कामात मी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन खोके सरकार काय करते, याची मला माहिती नाही असे सुळे म्हणाल्या.