By Editor on Tuesday, 05 September 2023
Category: बारामती

[sakal]बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा

सुप्रिया सुळेंची मागणी

बारामती : जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन चारा छावण्या तसेच पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. पावसाळा संपत आला तरी बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हे व मुळशी या तालुक्यातील बहुतेक ठिकाणी अजूनही सरसरीइतका पाऊस पडलेला नसून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हातची पिके गेली, दुभत्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना प्यायला पाणी नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच चारा छावण्या सुरू कराव्यात, आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी या पत्रात केली आहे.

वरील सर्व तालुक्यातील ग्रामस्थांचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती हेच आहे. या भागातील दुष्काळी परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी तसेच पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे.

शासनाने जिल्ह्यातील या परीस्थितीचा तातडीने आढावा घेऊन, दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. याचबरोबर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सूरु करावेत, पशुधनाला नियमित चारा मिळण्यासाठी चारा छावणीचे नियोजन आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी करावी, असे सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा; सुप्रिया सुळेंची मागणी | Sakal

Leave Comments