By Editor on Wednesday, 23 October 2024
Category: बारामती

[Sakal]लाडकी बहीण योजनेचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाचेच

सुप्रिया सुळे यांचा दावा

लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. याचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाला द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहिणी लाडक्या नव्हत्या, मात्र मतदारांनी दणका दिल्यानंतर सरकारला बहिणी आठवल्या, बहिणींशी फार पंगा नको म्हणून सत्तेतील लोकांनी पंधराशे रुपये देऊन बहिणींचे प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली..

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. याप्रसंगी विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, एस. एन. जगताप, संदीप गुजर, सत्यव्रत काळे, वनिता बनकर, आरती शेंडगे, पौर्णिमा तावरे, सतीश खोमणे, अशोक इंगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्रात आमचे सरकार येईल तेव्हा शेतीपूरक प्रत्येक गोष्टीवरील जीएसटी शून्य करू. अजित पवार यांचा नामोल्लेख न करता जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत राज्याच्या अर्थमंत्र्यांनी एकदाही उपस्थिती लावली नाही. त्यामुळे महाराष्ट्राला न्याय कसा मिळणार....

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सरकारच्या पैशाने जाहिराती करायचा नाही, असे विधेयकच आणू, अतिरिक्त खर्च कमी करु, निर्णय घेणाऱ्या लोकांनी जाहिरातबाजी करायची गरजच नाही. आपले युद्ध राज्यातील लोकांशी नसून दिल्लीतील अदृश्य शक्तीशी आहे, योग्य वेळ येताच या राज्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे सुळे म्हणाल्या.

धोंड्याच्या महिन्यात जावयाचे पाय धुण्याची प्रथा महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आपण बारामती मतदारसंघामध्ये बंद करू, त्याऐवजी लेक व जावयाने आई-वडील व सासू-सासर्‍यांचे पाय धुवावेत अशी प्रथा सुरू करू, असेही त्या म्हणाल्या..

या राज्यातील प्रमुख 1600 लोकांनी तुतारीच्या चिन्हावर आमदारकीची निवडणूक लढविण्याची मागणी केली असल्याने उमेदवारांची यादी जाहीर करण्यास काहीसा विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रत्येक उमेदवाराची वैयक्तिक मुलाखत घेऊन चर्चा केली आहे..

युगेंद्र पवार म्हणाले, काही लोक वेगळा प्रचार करून अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीत विरोधक कुठल्याही पातळीला जातील. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आपण हे पाहिले आहे, मात्र तुमच्यापैकी कोणाच्याही केसाला धक्का लागला. तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण सत्याची बाजू निवडली आहे, चुकीचे काही केलेले नाही.लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमचेच आहेत, ते पैसे सोडू नका. यापुढील काळात विधानसभेनंतर नगरपालिका, साखर कारखाने, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका आपल्याला ताकतीने लढवायच्या आहेत. 

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाचेच; सुप्रिया सुळे यांचा दावा credit of Ladki Bahin Yojana belongs to Baramati Loksabha Constituency Supriya Sule claim politics baramati

Leave Comments