By Editor on Monday, 13 March 2023
Category: बारामती

[Sakal]माहिती बाहेर पडण्याच्या प्रकरणांची चौकशी करा-सुप्रिया सुळे

 बारामती : छापे पडणार याची माहिती अगोदरच कशी बाहेर पडते, याची चौकशी गृहमंत्री अमित शहा यांनी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना भीती दाखविण्याचे सुरु असलेले राजकारण ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दात सुळे यांनी सध्या सुरु असलेल्या तपास यंत्रणांच्य कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली.

बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी या सर्व विषयावर मत मांडले. त्या म्हणाल्या, ईडी व सीबीआयचा तुम्ही डेटा तपासला तर केस दाखल झाल्यानंतर काय होते हेही एकदा पाहायला हवे. संजय राऊत यांची ऑर्डर पाहायला हवी, अनिल देशमुखांवर शंभर कोटींचा आरोप केला, शेवटी तो आकडा एक कोटींवर आला आहे. आरोप करायचे आणि पळून जायचे ही काही भारतीय संस्कृती नाही.

विरोधी पक्षांच्याच नेत्यावर ईडी कारवाई करते याचे आता अजिबात आश्चर्य वाटत नाही, ईडी आणि सीबीआयने अनिल देशमुख व कुटुंबियांची 109 वेळा चौकशी केली. हा खरतर एक विक्रमच म्हणावा लागेल. या देशात 95 टक्के विरोधी पक्षांच्याच नेत्यांवर कारवाया झाल्या, जे लोक भाजपमध्ये गेले त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या आहेत, असे दिसते.राजकीय बदला घेण्यासाठी तपासयंत्रणांचा गैरवापर होणे दुर्देवी आहे. देशाच्या महत्वाच्या तपास संस्था म्हणून ईडी किंवा सीबीआयचा नावलौकीक आहे, स्वतंत्र यंत्रणा म्हणून इतकी वर्षे त्यांनी काम केले आहे, सध्या सुरु असलेली दडपशाही ही दुर्देवी व संविधानाबाहेरची असल्याचे मतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

ज्या पध्दतीने नबाब मलिक, संजय राऊत, अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांच्या कुटुंबावर पडणारे छापे, हसन मुश्रीफ यांच्यावरही आता छापे घातले जातात. छापे घातले जाणार हे अगोदर काही लोकांना कसे समजते,अमित शहा यांनी या बाबत चौकशी करावी अशी मागणी लोकसभेत करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. आधीच अशा बातम्या बाहेर पडत असली तर राष्ट्रीय सुरक्षेचा हा गंभीर मुद्दा आहे, या साठी एक समिती नेमून गृहमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Supriya Sule : माहिती बाहेर पडण्याच्या प्रकरणांची चौकशी करा; सुप्रिया सुळे | Sakal

Leave Comments