सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, "गुंडगिरी…"
देशभरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गरबा, दांडियासाठी मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु, अशा कार्यक्रमांना काही संघटना विरोध करत असल्याचं पुढे येत आहे. आता पुण्यातील एक कार्यक्रम बजरंग दलाने बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. याबाबत त्यांनी बजरंग दलाला इशारा दिला आहे.
"बारामती येथील चिराग गार्डन येथे नवरात्रीच्या निमित्ताने सुरू असलेला दांडियाचा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. बारामतीत अशा पद्धतीने गुंडगिरी कधीच झाली नाही. हे 'मोरल पोलिसींग' यापूर्वीही आम्ही खपवून घेतले नव्हते आणि यापुढेही घेणार नाही. अशा प्रकारचे उद्योग करणाऱ्यांवर पोलिसांनी कायद्याने कठोर कारवाई करावी", असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
तसंच, नवरात्रोत्सवात दांडिया आणि गरबा खेळण्याच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलीस ठाणे, गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी पायी गस्त घालण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
नवरात्र उत्सवामध्ये दांडिया खेळण्याच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात आवश्यक तो बंदोबस्त लावण्यात यावा. हद्दीतील उद्याने, मोकळी मैदाने, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे या जागी गस्त घालावी. गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशाही सूचना पोलीस आयुक्त चौबे यांनी दिल्या.
रम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील विविध ठिकाणी असे कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे. इंदूरमधील भवरकुवा परिसरात गेल्या ३५ वर्षांपासून नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे आयोजक फिरोज खान यांच्यावर लव्ह जिहादचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. "या कार्यक्रमाचा उपयोग हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी केला जातो", असा आरोप स्थानिक बजरंग दलाने केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे.