आजची स्त्री घराच्या रुढ चौकटीतून बाहेर पडली आहे. आता तिचा वावर जवळपास सर्वच क्षेत्रात आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करते. स्वतःच्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी ती सक्षम आहे. अर्थात अजूनही त्याचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या अशा एकट्या महिलांची आपण जेंव्हा चर्चा करतो तेंव्हा मला माझ्या आजीची आवर्जून आठवण येते.
आई खुप लहान असतानाच माझे आजोबा सदुभाऊ शिंदे यांचे निधन झाले. त्यावेळी माझी आजी निर्मला शिंदे यांचे वय केवळ सत्तावीस वर्षांचं होतं. या संकटाला आजी मोठ्या धीराने सामोरी गेली. आजोबांच्या पश्चात तिनं सगळ्या मुलांचं संगोपन मोठ्या हिंमतीनं केलं. माझ्या आजीचं हे एकटीनं सर्व काही सांभाळणं म्हणजे नेमकं काय होतं त्याची कल्पना लहान वयात मला आली नाही, पण जसजसं जाणीवेच्या कक्षा रुंदावत गेल्या तसतशी मला ते उलगडत गेलं. आजीबद्दलचा माझा आदर अधिकच वाढला. कळत्या वयात मी विचार करायचे की, आजीला कधी एकटेपणा जाणवला असेल का ? हक्कानं मनातलं सगळं काही रिकामं करावं असा माणूस तिच्या आयुष्यातून तर केंव्हाच निघून गेला होता. अशा वेळी तिनं कितीदा तरी स्वतःशीच संवाद साधला असेल. स्वतःलाच तिनं जीवन जगण्यासाठी खंबीर केलं असेल. पुढे मी जेंव्हा सामाजीक जीवनात प्रवेश केला तेंव्हा अशा अनेक एकाकी महिलांशी माझा संपर्क आला. यशस्विनी, जागर, उमेद अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात मला थोडी का होईना अशा फुलविता आली, याचे समाधान आहे. मात्र ते पुरेसे नाही याची जाणीवही आहे. त्यांचा संघर्ष, जगण्याची धडपड या सर्वांशी मी जोडली गेली. त्या सर्वांमध्ये मी माझ्या आजीचा जीवनसंघर्ष पाहत असते.
आजीच्या जीवनसंघर्षात एक अदृश्य पोकळी आहे, असं मला नेहमी वाटतं. ती पोकळी तिनं कुठंच कधीच शेअर केली नसली तरीही… हीच पोकळी मला भेटायला येणाऱ्या एकल महिलांमध्ये जाणवते. कदाचित तीच त्यांना माझ्याशी घट्टपणे जोडणारा, किंबहुना माझ्यासाठी; मला तो धागा माझ्या दिवंगत आजीशी जोडतो. त्यांच्या एकटेपणाच्या वाळवंटात प्रेमासारख्या भावनेचं ओअसीस फुलायला हवं असं मला वाटतं म्हणूनच एकल महिलांविषयी लिहिण्यासाठी मी जाणीवपूर्वक १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे निवडला आहे. हा दिवस प्रेमाचा संदेश देणारे युरोपातील संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. तत्कालिन रोमन सम्राटाचा आदेश झुगारुन संत व्हॅलेंटाईन यांनी सर्वदूर प्रेमाचा संदेश रुजविला (भारतीय समाजात आज विविध समाज घटकात हा प्रेमाचा संदेश देण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाली आहे. कारण द्वेषाला, सूडाला बळ देणाऱ्या शक्ती प्रबळ होताना आपण रोजच अनुभवतो आहोत. ). त्यासाठी त्यांनी मरणही पत्करले. प्रेमासाठी मरण पत्करणारा हा संत म्हणूनच पुढच्या पिढ्यांसाठी प्रेमाचा संदेश देणारा देवदूत ठरला. प्रेम ही माणसाची अतिशय तरल भावना. ही भावना सर्वांसाठी आणि सर्वसमावेशक अशीच… म्हणूनच तिचे वेगळेपण नजरेत भरणारे ठरते.
व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगाने एकल महिलांचा मी विचार करते तेंव्हा माझ्यासमोर परीत्यक्ता, विधवा आणि इतर काही कारणांमुळे एकट्या राहिलेल्या महिलांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. या महिला मानसिकदृष्ट्या कणखर जरी असल्या तरी अचानक आलेल्या संकटाने सुरुवातीच्या काळात कांहीशा बावरुन गेलेल्या असतात. पण संकटांचा सामना करण्याची जिद्द त्यांच्यात असते. क्वचितच एखादी स्त्री मानसिकदृष्ट्या कोलमडून पडलेली तुम्हाला आढळेल. हजारो संकटांचा सामना करुन त्या संकटांना परतावून लावतात. संकटांशी झुंजताना त्या अनेकदा माझ्याकडे खंत व्यक्त करतात ती म्हणजे जिथं आपण व्यक्त होऊ अशी एक जवळची व्यक्ती असायला हवी होती.
मला वाटतं, आयुष्याशी दोन हात करणाऱ्या या शूर महिलांसाठी आपण सर्वांनीच व्हॅलेंटाईन म्हणून उभे ठाकले पाहिजे. त्यांच्या मनात एकाकीपणाची भावना रुजू नये. त्यांच्या संघर्षाला सतत बळ मिळावं. त्यांना यश मिळावं म्हणून त्यांच्या पाठीशी नाही तर त्यांच्यासोबत रहायला हवं. याची सुरुवात अर्थातच घरातूनच व्हायला हवी. आई-वडील, भाऊ-बहीणी आणि इतर नातेवाईकांनी त्यांचे हे एकटेपण स्वीकारावं. त्यांना माणूस म्हणून त्यांची स्पेस जपू द्यावी. ही स्पेस त्यांच्यासाठी स्वतःशी हितगूज करण्यासाठी आवश्यक असते. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आपण त्यांना ही भेट तर नक्कीच देऊ शकू, नाही का ? कारण आदरणीय कविवर्य कुसूमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे,
“प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्षआणि भविष्यकालातील अभ्युदयाची आशा एकमेव “म्हणून हा आशेचा दीप तेवत ठेवूया…! -सुप्रिया सुळे, खासदार