[News18 Marathi]'बँकेतील पैसे लगेच काढून घ्या, नाहीतर...'
सुप्रिया सुळेंचा लाडक्या बहिणींना सल्ला
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण 1500 रुपयांची आहे. बहीण आणि व्यवसाय याचं नात सरकारला कळेलच. मतदान केलं नाही तर पैसे परत घेतील म्हणून पैसे काढून घ्या. सरकारची मानसिकता बरोबर नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवारांच्या रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने 55 हजार महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळेही आल्या होत्या.
रोहित पवारांच्या विरोधात चंद्रावरूनही आणि कोणीही उमेदवार आणला तरी जनता त्याला मतदान करेल, रोहित सर्वात जास्त वेळ मतदारसंघात असतो, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांचं कौतुक केलं.
दुसरीकडे रोहित पवारांनी आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. मी मोठमोठ्या लोकांना जनतेसाठी अंगावर घेतलं आहे. मी घाबरत नाही आणि दिल्लीसमोर झुकणार नाही. मी शरद पवारांसोबत राहिलो म्हणून मला त्रास दिला जातोय. मी स्वाभिमानी आणि स्वाभिमानासोबत राहणार, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
तसंच मी दारू आणि पैसे वाटले नाही आणि वाटणार नाही, मात्र तळागाळापर्यंत पाणी देणार, त्यात राजकारण करणार नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.

