[Civic Mirror]खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत जावेसे का वाटले नाही?
व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्व अपयशी ठरल्याची सुप्रिया सुळे यांची खंत
मुंबई – भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे जावेसे का वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून आणि व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरलो आहोत, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त ेली.
सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि. १३) पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ''महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने मोठ्या विश्वासाने मतदान केले आहे. त्यांना एवढी मोठी संधी दिली. पण महाराष्ट्राची जी पुरोगामी विचाराची भावना, जो विचार राहिलेला आहे, त्याला सातत्याने काळीमा फासण्याचे काम या सरकारमधील काही लोकांकडून होत आहे. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील माणसांचेही नुकसान होत आहे. आम्ही सर्वांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही गंभीर आत्मचिंतन केले पाहिजे.''
भोंदू अशोक खरात हा एकटा नाही. हे एक खूप मोठे रॅकेट आहे. एक भोंदूबाबा अजून काय-काय उद्योग करत होता हे देवालाच ठाऊक? पण, केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणी कोणतीही तडजोड न करता, कोणत्याही दबावाला न बळी पडता या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत…
विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीत पारदर्शकता ठेवून त्यात सातत्य ठेवावे. त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. प्रस्तुत प्रकरणात सत्तेतील अनेक लोकांचा समावेश आहे. या भोंदूबाबाच्या विरोधात पोलीस यंत्रणा आणि गृहमंत्रालय जे काही करत आहे ते स्वागतार्ह आहे. चांगल्याला चांगलेच म्हटले पाहिजे. पण महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत.''
…या गोष्टीची समाजात चर्चा झाली पाहिजे
खरातकडे जाणाऱ्या कोणत्याही महिलेला, जिचे शोषण होत होते, तिला असे का वाटले नाही की आपण कोणत्या तरी व्यक्तीकडे जावे आणि न्याय मागावे. आपण व्यवस्था म्हणून अपयशी ठरलो की, व्यवस्थेतील काम करणारे आपण लोक म्हणून आपण अपयशी ठरलो. एवढ्या मोठ्या प्रमाणात शोषण सुरू असताना कुणाला का वाटले नाही की, आपण जाऊन पोलिसांत जाऊन न्याय मागावा. या गोष्टीची समाजात चर्चा झाली पाहिजे. खरातकडे एवढे मोठे राजकीय नेते, अधिकारी आणि जबाबदार लोक जात होते. त्यामुळे लोकांना आपल्याला न्याय मिळेल याचा विश्वास नव्हता.

