[My Mahanagar[]प्रभाग रचना राजकीय दबावाने होऊ नये; सुप्रिया सुळेंनी घेतली मनपा आयुक्तांची भेट
पुणे – पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभाग रचना शुक्रवारी (22 ऑगस्ट) जाहीर झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. मात्र या प्रभाग रचनेने सगळ्याच पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. कोणाच्याही दबावाखाली प्रभाग रचना नको, यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यासाठी आज त्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांची भेट घेतली.
पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करु नये. हा देश कायद्याने आणि संविधानाने चालतो. कोणच्या सोयीने आणि मनमर्जीने चालू नये.
खासदार सुळे म्हणाल्या की, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की 4 सप्टेंबर पर्यंत तुम्ही तुमच्या हरकती मांडा. 4 तारखेपर्यंत अनेक सण-उत्सव आहेत. वर्किंग डे फार कमी आहेत. त्यामुळे हरकती नोंदवण्यासाठीचा वेळ वाढवण्याची मागणी आम्ही केली आहे. निवडणूक आयोगालाही विनंती करणार आहे की, प्रभाग रचनेबद्दल हरकती नोंदवण्यासाठी 10 तारखेपर्यंत वेळ वाढवून द्यावा. 27 ऑगस्टपासून 6 सप्टेंबर पर्यंत गणपती उत्सव आहे. सार्वजनिक उत्सवासोबतच प्रत्येकाच्या घरी गणपती आहेत. त्यामध्ये सर्व व्यस्त असणार आहेत. त्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. नियम कायद्याप्रमाणे सर्व प्रभागरचना झाली पाहिजे. हरकती नोंदविण्यासाठी वेळ वाढवून दिला पाहिजे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
खासदार सुळे म्हणाल्या की, नागरिकांची गैरसोय होईल अशी वॉर्ड रचना नको. नागरिकांची सोय होईल अशी वॉर्ड रचना असली पाहिजे. निवडणूक जिंकण्यासाठी वॉर्ड रचना केली जाऊ शकत नाही. प्रत्येक वॉर्डसाठी वेगळा फॉर्म्यूला केला गेला आहे, हा कुठला नियम लावला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वैयक्तिक आरोप आहेत. यावर योग्यवेळी उत्तर दिले जाईल, असे अजित पवार म्हणाले. ते म्हणाले की, कुठल्याही बाबतीत कोणतीही कामं केली की त्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतात. जेवढ्या व्यक्ती तेवढी मतमतांतरे असू शकतात.

