[Maharashtra Times]'तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
सरकारकडून महिलांचा विश्वासघात', सुप्रिया सुळे यांचा घणाघात
मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी ही योजना जाहीर करण्यात आली होती. ही योजना अत्यंत लोकप्रिय योजना ठरली. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला. या योजनेच्या माध्यमातून अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकून आल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक केलं. ही योजना ज्या गरजू आणि लाभार्थी महिलांना आवश्यक आहे, ज्या महिला खरंच निकषांत बसतात याची चाचपणी करण्यासाठी सरकारने ई-केवायसी करण्याचं आवाहन लाडक्या बहिणींना केलं.
विशेष म्हणजे सरकारकडून ई-केवायसीसाठी अनेकवेळा मुदतवाढ देखील करण्यात आली. अखेर मार्च 2026 ला ई-केवायसीची शेवटची तारीख होती. यापुढे सरकारने ई-केवायसीसाठी तारीख वाढवली नाही. पण आता या ई-केवायसीच्या माध्यमातून अपात्र झालेल्या महिलांची मोठी आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील तब्बल 80 लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबत वृत्त दिलं आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ई-केवायसी अपडेट न झाल्यामुळे किंवा निर्धारित वेळेत कागदपत्रे अपडेट न होऊ शकल्यामुळे, तसेच इतर निकषांत न बसल्यामुळे तब्बल 80 लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत. या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या ही 2 कोटी 46 लाख इतकी होती. पण यामधून 80 लाख महिला या अपात्र ठरल्यामुळे आता या योजनेच्या सध्याच्या लाभार्थी महिलांची संख्या आता 1 कोटी 66 लाख इतकी झाली आहे. लाभार्थी महिलांच्या घटलेल्या संख्येवरुन विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरुन सरकारवर सडकून टीका केली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?"लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले. निवडणूकीच्या काळात कसलीही खातरजमा न करता घाईघाईने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आणि आता साधारणपणे वर्ष दीड वर्षाने सरकारला या योजनेत ८० लाख महिला अपात्र असल्याचा साक्षात्कार व्हावा ही मोठी अजब बाब आहे. हे या सरकारचे राजकीय, प्रशासकीय आणि अंमलबजावणीतील सामूहिक दारुण अपयश आहे", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा अनेकांनी विरोध केला. पण मी आपल्याला सांगतो, कुणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही", अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे.

