2 minutes reading time (401 words)

[Sakal]समाजातील अस्वस्थतेची दखल घेत निवडणूक आयोगानेही बदल स्वीकारला पाहिजे

समाजातील अस्वस्थतेची दखल घेत निवडणूक आयोगानेही बदल स्वीकारला पाहिजे

पुणे - अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ईव्हीएमवर बंदी आहे. मी चार वेळा ईव्हीएमवर निवडून आले आहे, माझ्यासह समाजातही ईव्हीएमबाबत अस्वस्थता आहे. म्हणूनच ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी होत आहे. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगानेही बदल केला पाहिजे, ' अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली. सर्वांशी चर्चा करूनच ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत पुढील आठवड्यात ठरविले जाणार असल्याचेही सुळे यांनी सांगितले.

मार्केट यार्ड येथील निसर्ग कार्यालयामध्ये सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे उपस्थित होते. ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार का ? या प्रश्‍नाबाबत सुळे म्हणाल्या, \"इंडिया आघाडीतील घटक पक्षांची मागील आठवड्यातच चर्चा झाली.

कॉंग्रेस पक्ष अनेक वर्ष ईव्हीएमबाबत काम करत आहे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर आमच्या कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या मनातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. उत्तम जानकर यांचे आंदोलन व मारकडवाडीतील लोकांमधील ईव्हीएमबाबत अस्वस्थता आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांच्या मनातील ऐकून घेतले पाहिजे.'.

सुळे म्हणाल्या, 'कॉंग्रेस पक्षाचे संग्राम थोपटे यांना अनेक केंद्रांवर अत्यल्प मतदान झाले आहे. अशी अनेक उदाहरणे आम्ही देऊ शकतो. हे असे होऊच शकत नाही, असे सर्वांचे म्हणणे आहे. म्हणून उत्तम जानकर यांचा प्रयोग आहे. आम्ही कोणाच्याही वैयक्तीक विरोधात लढत नाही.तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि समाजात एखाद्या प्रक्रियेबद्दल शंका असेल, तर ती दुरुस्त व्हायला पाहिजे इतकीच आमची मागणी आहे. विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमबाबतचे अनेक पुरावे आम्ही आयोगाला दिले आहेत. बॅलेटवर निवडणूक झाल्यास कोणतीच अडचण येणार नाही.

सत्तास्थापनेला झालेला विलंब व शपथविधीवर बहिष्कार टाकण्याच्या मुद्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, 'भाजप सरकार यापूर्वी आले तेव्हा, त्यांच्यात सरकार स्थापनेविषयी आक्रमकता होती. यावेळी मात्र निकाल लागल्यानंतरही भाजपने दोन आठवडे सत्तास्थापना व मुख्यमंत्री ठरवण्यासाठी घेतले.आता मंत्रीमंडळाच्या विस्तारालाही उशीर होत आहे. त्यांना इतके मोठे संख्याबळ मिळाले असेल, तर मग लोकांच्या अपेक्षाही असतील. शपथविधीवर बहिष्कार टाकणे हा निर्णयाचा भाग आहे, तो धोरणाचा भाग नाही. इंडिया आघाडीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र आहोत.'.

सुळे म्हणाल्या,- 

देशाच्या दरडोई आर्थिक उत्पन्न, विकास दरातील फरकामुळे गंभीर प्रश्‍न उद्‌भवण्याची शक्‍यता- 

सशक्त विरोधी पक्षासाठी ममता बॅनर्जी पुढे येत असतील तर त्यांचे स्वागतच- 

शपथविधी सुरु असतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यत्र्यांना समाजमाध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या- 

कॉंग्रेसच्या पूर्वीच्या कृतीप्रमाणे विरोधी पक्षनेतेपद देण्याचा मोठेपणा भाजपने दाखवावा- 

संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे कसे दाखल होतात?- 

सरकार गरिबांना मुदत संपलेली औषधे देत असेल तर हा प्रश्‍न गंभीर आहे.

[Lokmat]पेपर फुटला तर परीक्षा रद्द होतेच ना? : खास...
[TV9 Marathi]मालमत्ता प्रकरणात अजितदादांना कोर्टाच...