[Saam TV News]सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान, निवडणूक आयोगाबद्दल काय म्हणाल्या?
"शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीवरून महत्त्वाचं विधान केलं आहे. दोन्ही पक्ष ज्या पद्धतीने फोडले गेले ती प्रक्रिया संविधानाच्या चौकटीत बसणारी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले, ते अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीमध्ये ते बसत नाही. हे आमच्या विरोधकांनाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या त्या अमान्य आहेत. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा गैरवापर झाला, ज्या पद्धतीने त्या यंत्रणेचा गैरवापर झाला ते लोकशाहीसाठी घातक आहे," असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या मालकीच्या मुद्द्यावरही सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं त्यांनी म्हटलंय. यासाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्याचा दाखला दिला..
"शिवसेना ही काल, आज आणि उद्या उद्धव ठाकरे यांचीच असणार आहे. त्याच कारण असं की बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातात दिला त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. आणि समजा एखाद्याचं काही वेगळ मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने त्यांनी करायला हवं होतं. त्यांना कोणी अडवलं होतं. स्वत:च्या कर्तृत्वावर पक्ष उभा करणं ही कौतुकाची गोष्ट आहे.".
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीबाबतही सुप्रिया सुळे यांनी आपली बाजू मांडली. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडर मेंबर असल्याचं सांगताना पक्षाच्या संविधानातील तरतुदींचाही त्यांनी उल्लेख केला. आमदार आणि खासदार यांच्या मतदानाला पक्षाच्या मालकीच्या निर्णयात स्थान नसल्याचं त्यांनी सांगितलं..
"शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडर मेंबर आहेत आणि राष्ट्रवादीचं जे संविधान आहे, त्यामध्ये आमदार आणि खासदार याचं मतदान नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचाच आहे तो कालही होता, आजही होता आणि उद्याही आहे, या संदर्भातील सर्व पुरावे आम्ही न्यायालयात सादर केले आहेत," असंही सुळे म्हणाल्या.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही सुप्रिया सुळे नाराजी व्यक्त केलीये. निवडणूक आयोगासारख्या संस्थेवर टीका करण आपल्याला आवडत नसल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात आयोगाने अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला.
"परंतु निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला हे मी जड अंतकरणाने म्हणते कारण आम्हाला अशा संस्थावर टीका करायला आवडत नाही. परंतु दुर्दैवाने निवडणूक आयोगाने अतिशय चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्षावर अन्याय केला का? तर केला," असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

