1 minute reading time (273 words)

[Zee News]दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणास सुप्रिया सुळेंची संमती?

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणास सुप्रिया सुळेंची संमती?

Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांची काय भूमिका असेल अशी उत्सुकता सर्वच कार्यकर्त्यांना होती. या उत्सुकतेवरुन आता पडदा हटला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला सुप्रिया सुळे यांनी मूक संमती दिली आहे. पक्ष घेईल ती भूमिका मान्य असल्याचं सांगून सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला हिरवा कंदिल दाखवला आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीत अचानक एकत्रिकरणाचे वारे वाहू लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एकत्रिकरणावर कुणीही थेट बोललं नसले तरी दुसऱ्या फळीतले नेते एकत्रिकरणासाठी उत्सुक असल्याचं सांगण्यात येतं आहे. कार्यकर्त्यांना देखील आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणाबाबत उत्सुकता लागली आहे.

शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना चर्चा करुन घ्यायचा आहे असं सांगून टाकलं होतं. शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात जर काही व्हायचे असेल तर ती पांडुरंगाची इच्छा असं सांगून टाकलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रिकरण दृष्टीपथात?

दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होईल असं काँग्रेस नेत्यांना वाटत नाही. पण शरद पवार यांचं राजकारण पाहिलं असल्यानं काँग्रेस काहीशी सावध असल्याचं पाहायला मिळतं आहे.

शरद पवार आणि अजित पवार हे काकापुतण्या एकत्र येण्यासाठी पक्षाच्या वर्धापनदिनाचा मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतं आहे. सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या पातळीवर कोणताही संघर्ष दिसत नाही. उलट एकमेकांबाबत पुरक भूमिका घेताना राष्ट्रवादीचे नेते दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची हीच ती वेळ हीच ती घटिका असल्याचं सांगण्यात येतं आहे. 

[TV 9 Marathi]Supriya Sule यांचा Vaishnavi Hagawan...