2 minutes reading time (399 words)

[ETV Bharat]'पवार साहेबांकडे कोणताही प्रस्ताव नाही'; काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

'पवार साहेबांकडे कोणताही प्रस्ताव नाही'; काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

नागपूर : देशातील प्रादेशिक राजकीय पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करण्यात यावे का?, अशा प्रकारची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या चर्चेत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नावाचाही उल्लेख केला जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी, "मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. ही माहिती मला तुमच्याकडूनच समजली. मला आणि पवार साहेबांना याबाबत काहीही माहिती नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं. देश आर्थिक संकटातून जात असताना पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलावून देशाच्या आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करावी, अशी आमच्या पक्षाची सातत्याने मागणी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

...त्या दोघींनी माझ्याशी चर्चा केलेली नाही : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यात झालेल्या भेटीबाबत विचारले असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, "त्या दोघींनी माझ्याशी याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही आणि मीही त्यांच्याशी बोललेले नाही. त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं, हे त्यांनाच माहीत. कोण कोणाच्या संपर्कात आहे, याची मला माहिती नाही. शरद पवार साहेबांकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि त्यांनीही कोणालाही कोणता प्रस्ताव दिलेला नाही." असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

सत्ताधारी विरोधक एकमेकांना भेटत असतात, त्यात गैर नाही : दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काही आमदार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने पक्षात अस्वस्थता असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांनाही भेटते. काल मी विनोद तावडे यांनाही भेटले. ते त्यांच्या कामासाठी आले होते आणि मी माझ्या कामासाठी गेले होते. राजकीय पक्षांतील नेते अनेकदा कामानिमित्त एकमेकांना भेटत असतात, त्यात काही गैर नाही," असं त्या म्हणाल्या.

पक्ष फोडण्याचे उद्योग आम्ही केले नाही आणि करणार नाही : देशातील आर्थिक परिस्थिती ही राजकारण करण्याची नव्हे, तर देश वाचविण्याची वेळ असल्याचं सांगत त्यांनी महागाई, बेरोजगारी आणि वाढता भ्रष्टाचार यांसारख्या प्रश्नांकडं लक्ष वेधलं. "नीट परीक्षेच्या पेपरप्रकरणात मुलांच्या भविष्याचा विचार करायचा की आपापसात वाद घालायचे? अडचणीत सापडलेल्या जनतेला आधार देण्याची आपली जबाबदारी आहे. घरफोडी आणि पक्षफोडीचे उद्योग आम्ही कधी केले नाहीत आणि करणारही नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रोहितचा मला सार्थ अभिमान : रोहित पवार यांच्या उपोषणाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी रोहितला सुरुवातीपासून उपोषण करू नको, अशी विनंती करत होते. हे सरकार असंवेदनशील आहे. त्याविरोधात लढण्याची ताकद आपण जपली पाहिजे. रोहितचे शेतकऱ्यांवर प्रेम आहे. शेतकऱ्यांसाठी तो लढा उभा करत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. सरकार किती असंवेदनशील आहे, याचे हे उदाहरण आहे." 

...

'पवार साहेबांकडे कोणताही प्रस्ताव नाही'; काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या असून, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
[Indian Express]‘No proposal sent or received’: Su...
[Navarashtra]शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस...