[News18 Marathi]सुप्रिया सुळे यांच्या कारला मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, गुजरातच्या गाडीची धडक
राष्ट्रवादीच्या नेत्या, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात झाला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. एका बेजबाबदार चालकाने त्यांच्या कारला बाजूने धडक दिल्याने हा अपघात घडला. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून सर्वजण सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे आज कामानिमित्त पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होत्या. महामार्गावर प्रवास सुरू असताना GJ13CF5257 या क्रमांकाच्या एका वाहनाने सुळे यांच्या कारला बाजूने जोरदार धडक दिली. समोरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने किंवा निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर GJ13CF5257 या वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे माझ्या गाडीला बाजूने धडक दिली, हा एक अत्यंत वाईट अनुभव होता. सुदैवाने, सर्वजण सुरक्षित आहेत.
अशा घटना आपल्याला याची जाणीव करून देतात की, रस्त्यावरील अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे असंख्य लोकांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना विनंती करतो की, सीट बेल्टचा वापर करा, सतर्क राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा, जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी सुरक्षित राहतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचे पुढील महिन्यात लग्न आहे. उद्योजक सारंग लखानी यांच्यासोबत रेवती सुळे यांचे लग्न ठरले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातल्या लोकांना निमंत्रण देण्यासाठी सुप्रिया सुळे यांची लगबग सुरू आहे. आज साताऱ्यातील कार्यक्रम आटपून सुप्रिया सुळे पुण्यामार्गे मुंबईकडे येत होत्या. त्यावेळी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान अपघात झाल्याचे कळते.

